इंग्लंडमध्ये झळकणार गडचिरोलीचा क्रिकेट स्टार!
“गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची भारतीय संघात निवड; ‘काउंटी क्लब क्रिकेट’मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार रोहित राठोड”
गडचिरोली | प्रतिनिधी, ६ जुलै : गडचिरोलीच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या घटक महाविद्यालय असलेल्या मॉडेल डिग्री कॉलेजच्या बी.बी.ए. (जंगल व्यवस्थापन) शाखेचा विद्यार्थी रोहित राठोड याची इंग्लंडमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय प्रतिनिधी संघात निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गोंडवाना विद्यापीठ परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेहनत, जिद्द आणि क्रिकेटप्रती असलेल्या समर्पणाच्या बळावर रोहितने हे यश संपादन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही केवळ त्याच्यासाठीच नव्हे, तर मॉडेल कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे.
रोहितच्या या यशाबद्दल मॉडेल डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. विवेक जोशी यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी रोहितचे अभिनंदन करत इंग्लंडमधील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. “रोहितचे यश हे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, त्याने भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी,” अशी भावना प्राचार्य डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनीही रोहितचे अभिनंदन केले. इंग्लंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून विद्यापीठासह देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
रोहितच्या निवडीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या ध्येयांसाठी झेप घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. आता सर्वांच्या नजरा इंग्लंडमधील स्पर्धेकडे लागल्या असून, गडचिरोलीचा हा युवा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय मैदानावर दमदार कामगिरी करून भारताचा तिरंगा उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
— GNN NEWS | Gadchiroli News Network
