कुरखेडा – कोरची – देवरी हा राष्ट्रीय महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा
1 min read“महामार्ग आहे की अपघातमार्ग: मागील ११ महिन्यांत चौदा जणांनी गमावला जीव”
कोरची, नंदकिशोर वैरागडे; ९ फेब्रुवारी:
कुरखेडा- कोरची- देवरी क्रमांक ५४३ या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभालीसाठी कार्यरत अधिकारी यांच्या निष्काळजी व दुर्लक्षितपणामळे आडवळणी रस्त्यावर डॉयवर्शन आणि रस्त्यालगत असलेल्या झाडी झुडपे न तोडल्याने समोरून येणारे वाहन न दिसल्याने मागील ११ महिन्यांत या महामार्गावर जवळपास चौदा नागरिकांना अपघातात जीव गमावल्याची नोंद कोरची,चिचगड व बेळगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे की अपघातमार्ग असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वात अतिदुर्गम, आदिवासीबहुल कोरची तालुक्यात नक्षल कारवायांना आळा बसल्याने सर्व सामान्य व निष्पाप नागरिकांचा निघृणपणे रक्तरंजित संघर्ष एवढ्यात थांबले असले तरी कुरखेडा कोरची देवरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ ने मागील ११ महिन्यांपासून १४ जणांचा जीव घेतल्या नंतरही अपघातांची शृंखला सुरुच असल्याने या ना त्या कारणाने सर्व सामान्य माणसाचा जीव जातच असल्याने नक्षल्यांची भुमिका आता कोरचीच्या राष्ट्रीय महामार्ग वटवित तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुरखेडा- कोरची- देवरी क्रमांक ५४३ या राष्ट्रीय महामार्गावर नव वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पोलीस स्टेशनच्या बैठकीला उपस्थित राहून परतीच्या मार्गावर असलेल्या पड्यालजोब येथील पोलीस पाटलाचा ९ जानेवारीला बोडेना जवळ झालेल्या अपघातात उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाल्याची घटना घडली होती, पुनाराम पोरेटी वय ५० असे मृत्यू पोलीस पाटलाचे नाव आहे.
मोहगाव जवळील आडवळणावर समोरील झुडपामुळे येणारी दुचाकी न दिल्याने नुकत्याच नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या २ फेब्रुवारीला झालेल्या अपघातात सबिलाल भारत सोरी मोहगाव,मानकीबाई संतराम सोनवानी ईळदा व अपघाताच्या धक्क्याने एका गर्भवतीला तिच्या पोटातील सहा महिन्यांच्या गर्भाला गमवावे लागले. या अपघातात घटनास्थळीच दोन जण दगावले होते. पोटातील गर्भाच्या रूपाने तिसराही जीव गेला आहे.
कोरची पासून पाच किलोमीटर अंतरावर येत असलेल्या झंकारगोंदी फाट्यावरील वळणावर २ जून गुरुवारच्या रात्रोला ९.३० वाजता दरम्यान कार आणि मोटारसायकलचे भीषण अपघात झाले. यामध्ये मोटारसायकल चालक सुकेल शामलाल नैताम २२ वर्ष रा. टाहकाटोला याचे जागीच मृत्यू झाले. तर प्रवीण सदाशिव कोरचा २५ वर्ष रा.टाहकाटोला हा गंभीर जखमी झाला होता.
मुख्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर कोरची कुरखेडा राष्ट्रीय महामार्गवर धानाचे भारे भरण्यासाठी उभा असलेल्या बैल बंडीला दुचाकी चालकाने धडक दिल्याने एकच मृत्यू तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना ४ नोव्हेंबरला संध्याकाळी सातच्या सुमारास घडली होती .कोरची तालुक्यातील लेकुरबोडी येथून साक्षगंधाच्या कार्यक्रमातून येत असलेल्या दुचाकीस्वारांनी उभ्या बैलबंडीला धडक दिली. सदर बैलबंडी ही रस्त्याच्या कडेला होती व कोरची येथील शेतकरी चिंतामण केंवास हे आपले धानाचे भारे बैलबंडी मध्ये भरत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिल्यामुळे केंवास हे गंभीररित्या जखमी झाले. बैल बंडीवर भारे भरण्यासाठी सोबत असलेला नातू सुरक्षित राहिला. चिंतामण यांना तातडीने गडचिरोली येथे रुग्णवाहिकेने पाठवण्यात आले व मेंदूमध्ये मार लागल्यामुळे त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले होते.
कोरची देवरी या महामार्गावर मुख्यालयापासुन २ कि मी अंतरावर असलेल्या पकनाभट्टी येथील मुख्य चौकात परस्पर विरोधी दिसेने प्रवास करीत असलेल्या दोन मोटारसायकली धडकेत झालेल्या अपघाता चार जन गंभीर जखमी झाले तर एका जागेवर मृत्यू झाल्याची घटना १७ मार्च ला दुपारी १२ च्या सुमारास घडली होती .यात पाच अपघातग्रस्तापैकी पुरषोत्तम अलोने कोहळीटोला, अशोक नायक अंबोरा, तुळशीराम कवास रेंगेपार हे गोंदिया जिल्ह्याचे रहिवासी होते.कांतालाल घुघवा दोडके व प्यारेलाल घुघवा दोडके हे कोरची तालुक्यातील रहिवासी असून यामध्ये कोरची येथे उपचारा दरम्यान कांतालाल घुघवा याचे मृत्यु झाले होते.
मागील अकरा महिन्यांत जवळजवळ चौदा नागरिकांना या राष्ट्रीय महामार्गावर आपला जीव गमावला असला तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने अपघातांची शृंखला खंडीत करण्यासाठी अद्यापही ठोस उपाययोजना न केल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आगळीवेगळी दहशत निर्माण झाली असून या मार्गावरून आजही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
“महामार्ग देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नाही तरी बेडगाव घाटावर रेडीअम,कठडे , स्पीड ब्रेकर पट्टा व रस्त्यातील झाडी झुडपे कापलेले आहेत, यामुळे अपघात झाला असे म्हणता येणार नाही”
श्री.प्रशांत खापरे, अभियंता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३