December 23, 2024

“भ्रष्टाचार अर्थ आणि व्याख्या”

1 min read

भ्रष्टाचार हा शब्द पैसा खाणे एवढ्याच मर्यादित अर्थाने वापरला जातो .

एवढेच नव्हे तर घोटाळे , कमिशन , अफरातफर हे पर्यायी शब्द वापरूनही भ्रष्टाचाराची ओळख होते .

समाजव्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही मूल्ये व नैतिक नियम असतात , त्यांचे उल्लंघन करून समाजातील व्यक्ती जेव्हा समाजाच्या परंपरागत चाकोरीच्या बाहेर जाऊन वर्तन करते , तेव्हा ते भ्रष्ट वर्तन ठरते .

साधारणपणे व्यक्ती स्वत : च्या हिताकरिता सार्वजनिक बाबींचा असा वापर करतो की , ज्यामुळे सामाजिक नियम आणि कायदे यांचे उल्लंघन होते .
आपल्या देशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये अनेक पद्धतीने भ्रष्टाचार केला जातो .

*व्याख्या – १ . भ्रष्टाचार प्रतिबंध समितीने केलेली व्याख्या -* ” व्यापक अर्थाने सार्वजनिक पद किंवा समाजात उपलब्ध असलेल्या एका विशेष दर्जाशी संलग्न व्यक्तीने प्रभावाचा अनुचित अथवा स्वार्थासाठी उपयोग करणे , म्हणजे भ्रष्टाचार होय . ”

*२. इलिएट आणि मेरिल -* ” प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्वतःच्या लाभासाठी विशिष्ट कर्तव्य करण्यात हेतुतः कसूर करणे , म्हणजे भ्रष्टाचार होय ”
*स्वरूप -*
१. सत्तेचा तसेच सार्वजनिक धनाचा दुरुपयोग .
२. त्वरित काम करणे किंवा लायसेन्स बनविण्यासाठी धन घेणे .
३. नियुक्ती व निवडीसंदर्भात अनावश्यक राजनैतिक प्रभावाचा प्रयोग .
४. निर्माण , क्रय विक्रय तसेच दैनिक निर्माण कार्य या संदर्भातील निविदामध्ये लाच किंवा कमिशन घेणे . ५. खोटे दौरे , भत्ते , घरभाडे इ . चा दावा करणे .
६. भेटवस्तू स्वीकारणे .
७. उत्पन्नापेक्षा व्यय जास्त करणे .

*भ्रष्टाचाराची वैशिष्ट्ये -*
वरील व्याख्यांचे अवलोकन केल्यानंतर भ्रष्टाचाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे दिसून येतात किंवा सांगता येतात .

१. भ्रष्टाचार सर्वत्र असला तरी शासकीय विभागामध्ये त्याचे प्रमाण जास्त दिसून येते .

२. भ्रष्टाचार म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी मिळवलेला अनुचित फायदा होय .

३. भ्रष्टाचार हा नेहमी समाजातील व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी करतात . त्यातून व्यक्तीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाभ मिळतो .

४. भ्रष्टाचाराचे क्षेत्र व्यापक असल्याने सरकारी नोकरांपासून पुढाऱ्यांपर्यंत , खेडेगावापासून महानगरांपर्यंत त्याचे जाळे पसरले आहे .

५. भ्रष्टाचारात व्यक्तीकडून आपल्या कर्तव्याचे योग्य पद्धतीने पालन केले जात नाही . उलट जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला जातो .

*भ्रष्टाचाराची क्षेत्रे*
भ्रष्टाचार सर्व क्षेत्रात बोकाळलेला दिसतो . केवळ राजकीय क्षेत्राचे आणि शासकीय सेवा या क्षेत्रांचेच नाव घेऊन चालत नाही , तर याशिवाय आर्थिक , धार्मिक , शिक्षण , समाजसेवा या क्षेत्रातही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात पसरलेला दिसून येतो . त्याचे विमोचन पुढीलप्रमाणे करता येईल .

*१. प्रशासकीय सेवा -*
यामध्ये सरकारी कार्यालयाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल . बांधकाम खात्यामध्ये कमी दर्जाच्या वस्तू वापरून रस्ते , पूल निर्माण केले जातात , पोलीस प्रशासनामध्ये तक्रार नोंदवून घेण्यासाठी तसेच शिक्षा कमी स्वरूपाची लावण्यासाठी पैसे मागितले जातात .

ग्रामीण भागात व शहरी भागात समाजातील दुबळ्या लोकांच्या विकासासाठी विकास योजना राबविल्या जातात . त्या योजनांचा मोबदला देण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैसे मागितले जातात , स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मृत्यूपत्र , जन्म नोंदी , जागेचे उतारे घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात .

*२. धार्मिक सेवेतील भ्रष्टाचार -* अलीकडेच भ्रष्टाचारालासुद्धा धर्माश्रय प्राप्त झाला आहे . मंदिरात दर्शन घेण्यासाठी जास्त पैसे दिले की लवकर आणि चांगल्या पद्धतीने दर्शन मिळते , भ्रष्टाचार करून देवाला सोन्याचे दागिने घातले , सत्यनारायणाची पूजा केली , चार लोकांना जेवण दिले , की पुण्य प्राप्त होते अशी लोकांची भावना झालेली आहे . याशिवाय देव , धर्म , मंदिरे यांच्या कामांच्या पुनर्बांधणीसाठी बांधकाम करताना निकृष्ट दर्जाची कामे करून पैसे मिळविले जातात .

*३. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार -* शिक्षण क्षेत्रातील पावित्र्य अलिकडे संपुष्टात आले आहेत . आता शिक्षणाची ज्ञानमंदिरे म्हणण्याऐवजी भ्रष्टाचाराची संस्कार केंद्रे बनली आहेत . इंजिनिअरिंग , मेडिकलच्या शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या द्याव्या लागतात , परीक्षेत पास करण्यासाठी पैसे दिले जातात , कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना गुणवत्तेऐवजी अपात्र लोकांकडून भरमसाट पैसे घेऊन त्यांना नोकऱ्या दिल्या जातात .

*४. आर्थिक क्षेत्रातील भ्रष्टाचार -*
अलिकडच्या काळामध्ये ज्याच्याकडे अधिक पैसे त्याची समाजात चांगली प्रतिष्ठा , ही संकल्पना उदयास आली आहे . पैसे असले की सर्व सुख विकत घेता येते अशी प्रत्येक व्यक्तीची भावना तयार झाली आहे .
म्हणून भ्रष्टाचार करून जास्तीत जास्त पैसा मिळविण्यासाठी समाजात स्पर्धा सुरू झाली आहे . अलीकडे तर नवीन बँका , पतसंस्था लोकांना अधिक व्याजाचे प्रलोभन दाखवून ठेवी स्वीकारतात आणि त्यातून आपण श्रीमंत होऊन नंतर या आर्थिक संस्था दिवाळखोरीत दाखविल्या जातात .

*५. राजकीय सेवेतील भ्रष्टाचार -* भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर राजकीय क्षेत्र म्हणजे भ्रष्टाचाराची मक्तेदारी लाभलेले क्षेत्र मानले आहे . स्वत : च्या लाभासाठी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केला जातो . निवडणुकीमध्ये पैसे वाटून मते घेतली जातात . नंतर तो पैसा वसूल करण्यासाठी राजकीय पुढारी भ्रष्टाचार करतात .

*भ्रष्टाचाराची कारणे -* भ्रष्टाचार निर्माण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरले आहेत . त्यामध्ये सामाजिक मूल्यांचा ऱ्हास , आर्थिक असुरक्षितता , राजकीय व्यवस्था , कायद्यातील पळवाटा , भौतिकवादी जीवनपद्धतीचा वापर इ . कारणांचा यात समावेश होतो . त्याचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे .

*१. सामाजिक मूल्यांचा ऱ्हास -*
समाज व्यवस्थेमध्ये जीवन जगत असताना काही नियम , मूल्ये असतात . त्याला अनुसरूनच समाजातील व्यक्तीने वर्तन करणे अपेक्षित असते . परंतु आधुनिक बदलाच्या प्रक्रियेत या मूल्यांचा हास घडून आला आहे . कर्तव्ये , जबाबदारी , सेवा , त्याग , नैतिकता इ . बाबी बाजूला पडल्या आहेत . त्यामुळे काळाबाजार , कृत्रिम टंचाई , सार्वजनिक निधीचा गैरवापर लोकांकडून केला जातो .

*२. आर्थिक असुरक्षितता -*
आधुनिक काळामध्ये जगात आणि भारतीय समाजात असुरक्षितता ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे .

नवीन नियम आणि कायदे यामुळे समाजात मिळालेला दर्जा व संधी टिकून राहील की नाही याची भीती असल्यामुळे , मिळालेल्या संधीतून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला जातो .
अलीकडे तर शासन सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना बंद केल्यामुळे सरकारी कर्मचारी निवृत्तीनंतर आर्थिक असुरक्षिततेच्या भीतीतून भ्रष्टाचार करून जास्तीत जास्त पैसे मिळविण्याचा प्रयत्न करतात ..

*३. सामाजिक प्रतिष्ठा -*
आधुनिक युगामध्ये बुद्धी नसली तरी चालेल ; परंतु ज्याच्याकडे पैसा असेल तो समाजात प्रतिष्ठेने जगेल , अशी एकप्रकारची भावना निर्माण झाली आहे .
म्हणून ही प्रतिष्ठा जपून ठेवण्यासाठी समाजातील अनेक लोक भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा मिळवून आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढवितात .

पूर्वी शिक्षकाची नोकरी प्रतिष्ठेची मानली जात होती . परंतु तिथे पैसे मिळत नसल्यामुळे बरेच लोक ती नोकरी सोडून सरकारी नोकऱ्यांमध्ये पैसे कमविण्यासाठी येतात .
एखाद्या सरकारी कार्यालयात पैसे कमविण्याची संधी असूनही ती व्यक्ती भ्रष्टाचार करीत नसेल , तर ती चेष्टेचा विषय बनते .

*४. राजकीय व्यवस्था -*
आपल्या देशात तर राजकीय क्षेत्रांनी भ्रष्टाचारास मोठे खतपाणी घातले आहे .
त्यामुळे प्रशासकीय व राजकीय अनैतिकता बोकाळली आहे .

राजकीय पुढारी निवडून येण्यासाठी गैरमार्गाने पैसा कमवितात किंवा गैर धंदे करणाऱ्या लोकांना राजकीय आसरे देऊन निवडणुकीसाठी त्यांच्याकडून पैसे मिळवले जातात व पुढे त्यांना अवैध धंदे करण्यास अभय देतात .

निवडणुकीत खर्च झालेला पैसा परत मिळविण्यासाठी लाभाचे
पद मिळवून किंवा सरकारी अनुदाने , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून गैर मार्गाने पैसे मिळविले जातात .

*५ . लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे अपयश -*
शासनाने भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची निर्मिती केली . परंतु त्या विभागामार्फत कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जात नाही . या विभागाकडून कार्यवाही होण्यापूर्वीच भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी सावध होतात . पुढे भरलेले खटले तर पैसे देऊन बदलले जातात . म्हणजेच भ्रष्टाचार संपविण्यासाठीही भ्रष्टाचार केला जातो .
*कारणे – १. ऐतिहासिक कारणे -*
■ भारतीय प्रशासकीय अधिकारी व ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये वेतन व इतर सेवांबाबत केला जाणारा भेदभाव
■ स्वातंत्र्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी विभिन्न श्रेणींचा अनुभव , योग्यता न पाहताच भरती करण्यात आली .

*२. राजनैतिक कारणे -*
■ सत्तान्मुख राजनीती आणि दल – बदलसंबंधी समस्या .
■ कार्यकारी मंडळ व लोकप्रशासन यांवर विधिमंडळाचे प्रभावशाली नियंत्रण असणे .
■ राजनैतिक दलांमधील कार्यात्मकतेमध्ये अनुशासनहीनतेसारख्या तत्त्वांमध्ये वृद्धी .

■ भ्रष्टाचार थांबविण्यासाठी राजनैतिक पुढाकार व अपेक्षित इच्छाशक्तीचा अभाव .
■ प्रशासनिक कार्यामध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप .
*३. सामाजिक आणि सांस्कृतिक कारणे -*
■ समाजमान्यता
■ भारतीय समाज व संस्कृतीमध्ये असणारा अतिवाद , भाईभतिजावाद इ .
■ समाजामधील कुप्रथा – हुंडाप्रथा
■ समाजामध्ये शिक्षण व जागरूकता यांचा अभाव
■ जीवनस्तरामध्ये वृद्धी *४. आर्थिक कारणे -*
■ आर्थिक असमानता
■ काळ्या पैशाचा वाढता प्रभाव
■ ग्राहक जागरूकता व ग्राहक नियंत्रण यामध्ये विभिन्न प्रकारची कमतरता
■ कमी वेळात जास्त प्राप्त करण्याची इच्छा

*५ . प्रशासकीय कारणे -*
■ प्रशासनाचा सत्तावादी दृष्टिकोन
■ कार्यपद्धती गुंतागुंतीची
■ लोकसेवेत घटणारी नैतिकता –
■ कार्याची अधिकता
■ प्रशासनिक प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव .
*६.वैधानिक कारणे -*
■ भ्रष्टाचार थांबविण्यासाठी बनविलेले कायदे व नियम यामध्ये कमी .
■ कायद्यांच्या क्रियान्वयनामध्ये कमी .
■ वैधानिक प्रक्रिया गुंतागुंतीची व विलंबकारी .
■ आंतरिक तक्रार निवारण व्यवस्थेमध्ये कमी .
*भ्रष्टाचाराचे परिणाम -*
भ्रष्टाचाराचे अत्यंत दूरगामी , विघातक परिणाम भारतीय समाजावर होत आहेत .
कारण ही सम कर्करोगासारखी संपूर्ण भारतीय समाजाला पोखरत आहे .
१. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था पोखरली गेली आहे .
२. देशाचा आर्थिक विकास मंदावला आहे .
३. काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था देशात निर्माण झाली आहे .
४. विकास प्रक्रियेवर वाईट परिणाम घडून आले आहेत ..
५. समाजात हिंसा , अराजकता निर्माण झाली आहे .
६. समाजातील मूल्यव्यवस्था ढासळली आहे .
७. गुन्हेगारी वाढत चालली आहे .
८. राजकीय आणि प्रशासकीय सेवेतील लोकांवरील समाजाचा विश्वास उडाला आहे .
९ . खाद्यपदार्थामध्ये भेसळ केल्यामुळे लोकांच्या आरोग्याला/0 धोका निर्माण झाला आहे .
*भ्रष्टाचार निर्मूलनासाठी उपाययोजना -*
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तीन प्रकारच्या उपाययोजना सांगितल्या जातात .
१. प्रतिबंधात्मक उपाय
२. दंडात्मक उपाय
३. सुधारणात्मक उपाय .
*१. राजनैतिक व प्रशासनिक -*

■ जनतेमध्ये शिक्षणाचा प्रसार करून भ्रष्टाचाराविरुद्ध जनविचार विकसित करणे .

■ भ्रष्टाचाराची न्यायिक चौकशी करणे .

■ लोकपालसारख्या संस्थांची स्थापना करणे .

निवडणूक प्रक्रियेस सरळ व स्वच्छ बनविणे .

■ प्रशासनामध्ये लोक सहभाग वाढविणे .

■ सत्तेचे विकेंद्रीकरण करणे .

■ भ्रष्टाचारविरोधी समिती , गुप्त समिती , सतर्कता आयोग , भ्रष्टाचारविरोधी संगठन इत्यादींना प्रभावशाली बनविणे .
*२. सामाजिक – आर्थिक -*
■ भ्रष्टाचारींची निंदा व सार्वजनिक बहिष्कार हुंडाप्रथेसारख्या अन्य प्रथांना प्रतिबंधित करणे . जनशिक्षा , जनसहभाग इत्यादींची चांगली व्यवस्था करणे .

■ साधी राहणी व उच्च विचारसरणी यास प्राथमिकता व प्रोत्साहन देणे .

■ कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देणे .

■ उच्च अधिकाऱ्यांद्वारे अधीनस्थांसमोर नैतिक व उच्च आदर्शाचे मापदंड प्रस्तुत करणे .

*३. वैधानिक -* कायद्याच्या तरतुदींमध्ये स्पष्टता
■ नियम विनियम व प्रक्रियेमध्ये सरलता.
■ भ्रष्टाचारी प्रशासनिक अधिकारी , राजनेता यांच्यासाठी कठोर दंडाची व्यवस्था करणे .
■ न्यायिक प्रक्रिया गतिशील व तत्पर बनविणे .
■ भ्रष्टाचाररहित प्रशासनसंबंधी तरतुदींना राज्याच्या मार्गदर्शक ) तत्त्वांमध्ये समाविष्ट करणे व त्यांस मूलभूत अधिकारांशी जोडणे .

*भ्रष्टाचार निवारणासाठी सरकारने केलेले उपाय -* भारतात भ्रष्टाचार निर्मूलनाकरिता शासनाने काही कायदे तयार केले . त्यातील पहिला कायदा
१९४७ चा भ्रष्टाचार निर्मूलन कायदा होय . परंतु त्यात अपूर्णता असल्यामुळे १९५२ साली त्यात सुधारणा करण्यात आली .
त्यानंतर सप्टेंबर १९८० मध्ये भ्रष्टाचार निर्मूलन दुसरा कायदा तयार करण्यात आला .
*भ्रष्टाचाराचा अभ्यास १. संथानम समिती – १९६२ – केंद्र सरकारने भ्रष्टाचाराच्या संदर्भात के . संथानम समिती नेमली होती . समितीचे उद्देश -*
१. भ्रष्टाचार आणि लाचलुचपतीच्या संदर्भातील खटले लवकर निकालात काढणे .

२. भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील पळवाटा शोधून कायद्यात संदिग्धता राहाणार नाही याची काळजी घेणे . याकरिता उपाययोजना सुचविणे .

३. सार्वजनिक आणि समाजसेवक यांच्यामध्ये उभयपक्षीय चांगले संबंध राहण्याच्या दृष्टीने उपाय सुचविणे .

About The Author

error: Content is protected !!